Friday, January 19, 2018

बायबलमधील डेविड-रचित स्तोत्र आणि शिवाजी महाराज



बायबलच्या जुन्या करारात ‘स्त्रोत्र संहिते’त २३ क्रमांकाचे स्तोत्र डेविडचे स्तोत्र म्हणून ओळखले जाते. हा डेविड म्हणजेच “David and the Goliath” कथेतील छोटा मुलगा. इस्रायलचा राजा सोलोमनचा पिता. या स्तोत्राच्या पहिल्या दोन ओळी काल एका मोटारीच्या मागे लिहिलेल्या दिसल्या.अनेक मोटारीच्या मागे असे संदेश लिहिलेले असतात. यात माझ्या कुतूहलाची गोष्ट म्हणजे त्या शब्दाशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र होते. त्यामुळे या ख्रिस्ती- स्तोत्राचा नवीन अर्थ शिवाजी महाराजांच्या संदर्भात मला उलगडला; तोच पुढे मांडतो आहे. माझ्या आकलनाप्रमाणे याची मांडणी करतो आहे,चांगले झाले तर ती ईश-कृपा समजावी; दोष आढळल्यास माझी चूक समजून घ्यावी.

The Lord is my shepherd, I shall not want.
आमचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे, मेंढपाळ ज्याप्रमाणे आपल्या प्राण्याची काळजी वाहतो, त्याप्रमाणेच आमचा सांभाळ करणारा प्रत्यक्ष ईश्वरच, आमचा राजा होऊन आला आहे. त्याच्या (स्व)राज्यात आम्हाला कशाचीच कमी नाहीये. भगवद्गीतेत (अध्याय ९वा) “योगक्षेमं वहाम्यहम” म्हणून आश्वस्त करणारा आज शिवाजीच्या रूपाने प्रकटला आहे. तो शिवाजी राजा आमची मनापासून काळजी घेतो. मेंढ्या बर्यापैकी आळशी व बिनडोक असतात, अशा मूर्खतेच्या गर्तेत फसलेल्या जनतेला शिवाजीने स्वराज्याचा मार्ग दाखवला. परकीय लांडग्यांच्या तावडीत पडणार्या हिंदू-जनांस अभय दिले, संरक्षण दिले. मंगेशकरांच्या शब्दात “बहुत जनांसी आधारू” !!!
He makes me lie down in green pastures,
he leads me beside quiet waters
.
हे केवळ स्वराज्य नव्हते, तर ते सुराज्यही आहे. हिरवळीवर निवांतपणे बसणार्या मेंढ्या, म्हणजे सुरक्षिततेचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. तसेच, शांत पाणी हे स्वराज्यातील स्थिरतेचे द्योतक आहे. आमच्या शिवाजी राजाने आम्हाला असे स्थिर, संपन्न ‘स्वराज्य’ दिले आहे, असाच याचा अर्थ होतो.
He refreshes my soul.
He guides me along the right paths for his name’s sake.
असा आमचा शिवाजी राजा गुलामगिरी आणि पारतंत्र्यात कुजत पडलेल्या या देशाच्या आत्म्यास नवचैतन्य देतो. “हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तो ‘श्रीं’ची इच्छा” असे शिवाजी महाराजांनी सांगितले. हे अमुक शिवाजीचे वा भोसले कुटुंबियाचे कार्य नाही, तर धर्मसंस्थापना हे देवाचे कार्य आहे. त्या परमेश्वराचे कार्य तुम्ही करा, असे शिवरायांनी आपल्याला सांगितले आहे. या मार्गावर आम्ही सर्व मार्गक्रमण करीत आहोत. या मार्गावर आमचे नेतृत्त्व प्रत्यक्ष शिवाजी राजा करतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. “हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली” याचीच अनुभूती वरील शब्दातून मिळते.
 Even though I walk through the darkest valley,
I will fear no evil, for you are with me; your rod and your staff, they comfort me.
साडे-तीनशे वर्ष परदास्यात खितपत पडलेल्या या समाजात शिवाजी महाराजांनी नवचैतन्य निर्माण केले. विरोधात प्रत्यक्ष मुघल सल्तनत असताना, आपले आप्तही निराश व हतबल होऊन शत्रूच्या गोटात सामील होण्याचा तो काळ. अशा अंध:कारमय काळात स्वराज्याचा वन्हि शिवरायांनी चेतवला. आमचे राज्य, आमचा राजा अशा भावनेने गलितगात्र झालेले सामान्य जन हाती येईल त्याचे भाले तलवारी बनवीत मुघालांविरुद्ध उभे राहिले. “हर हर महादेव” म्हणत शत्रूसैन्याची धूळधाण उडवणारे ही हिंदूंचे सैन्य निर्भयपणे शत्रूला सामोरे जात होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी न घाबरता झुंजत होते. अशा अविश्रांत लढ्यातून जन्माला आलेल्या या स्वराज्यात, एका बाजूला भवानी तलवार आमचे शत्रूपासून संरक्षण करणार होती. तर, दुसर्या हातातील न्यायदंड प्रजेच्या हक्कांचे रक्षण करणार होता व दुष्कार्माला शासन करणारा होता. त्यामुळेच खंडोजी खोपडेचा उजवा हात डावा पाय कलम करणारा शिवाजी राजा व दुसरीकडे कल्याण सुभेदाराच्या सुनेची आदरपूर्वक पाठवण करणारा शिवाजी हि दोन्ही रूपे मेंढपाळाच्या हातातील rod व staff प्रमाणे आम्हाला आश्वस्त करणारी आहेत.
You prepare a table before me in the presence of my enemies.
You anoint my head with oil; my cup overflows.
यातील पहिल्या ओळीचा नीट संदर्भ मला लागलेला नाही. दुसर्या ओळीतील तेलाने डोक्याला मालिश करण्याचा अर्थ पुन्हा स्थैर्य व सुबत्तेशी जोडता येईल. my cup overflows याचा शब्दशः अर्थ न घेता “कप कधीच रिकामा होत नाही” असा घ्यावा, असे राब्बी सलमान श्चाक्टर शालोमी यांचे मत आहे. हे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वर्धिष्णू होणारे आहे, शिवाजी महाराज गेल्यानंतरही हे स्वराज्य संपले नाही, किंबहुना जे टिकले तेच स्वराज्य होते. त्याला कधीच ओहोटी लागली नाही, हे स्वराज्य प्रत्यक्ष औरंगजेबासही संपवता आले नाही, ते ओव्हरफ्लो होत थेट अटकेपार गेले !!!
Surely your goodness and love will follow me all the days of my life,
and I will dwell in the house of the Lord forever.

शिवरायांची ही गुणवैशिष्ट्ये – त्यांचे “आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वाज्ञपणे  सुशील” ही आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. हा प्रेरणेचा स्त्रोत आम्हा भारतवासीयांसाठी सदैव उपयोगी आहे. या प्रेरणेने ग्रस्त आम्ही सदैव या स्वराज्याच्या निर्मितीत रत राहू, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशी स्वराज्ये निर्माण करू आणि अश्या स्वराज्यात, ज्यास प्रत्यक्ष “भगवंताचे अधिष्ठान” असेल, तिथे आम्ही निवास करू.               अर्धा मिनिटात त्या गाडीने स्वा. सावरकरांच्या “पुण्यभू” व्याख्येच्या मर्यादा तोडत या हिंदुस्थानातील हिंदू म्हणून स्वत:ला निर्विवाद सिद्ध केले. या देशातील महापुरुष, ज्याला धर्माच्या चौकटीत राहून ज्याला आपले म्हणता येतात, तो हिंदू का नाही ?? कल्पेशला वैयक्तिक असे वाटते की हिंदू-ख्रिश्चन म्हणजे काय , याचे उत्तर हा गाडीवान नक्की देऊ शकतो. किंबहुना, त्याने तो प्रश्न निकालात काढला सुद्धा !!! आधुनिक परिभाषेत धर्म-पुनर्संस्थापना करण्याची ही मी नांदीच मानतो... प्रश्न हा आहे कि इतर जन त्याकडे कसे बघतात ??... बघतात का ??